
नवी मुंबई एमआयडीसीमधील वॉलमेट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना तब्बल २१ हजार रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. ही पगारवाढ मिळवून देण्यासाठी धर्मराज्य कामगार, कर्मचारी महासंघाने कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर यशस्वी मध्यस्थी केली. धर्मराज्य महासंघाच्या प्रयत्नांमुळे या कामगारांना तीन वर्षांपूर्वी १५ हजार रुपयांची पगारवाढ मिळाली होती. आता पुन्हा तीन वर्षांसाठी २१ हजारांची पगारवाढ मिळाली आहे. त्यामुळे सहा वर्षांत या कामगारांचा पगार तब्बल ३६ हजार रुपयांनी वाढला आहे.
वॉलमेट कंपनीचे व्यवस्थापन आणि धर्मराज्य कामगार, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यात नवी मुंबई एमआयडीसीतील रमाडा हॉटेलमध्ये बैठक झाली. याच बैठकीमध्ये पुढील तीन वर्षांसाठी कामगारांना २१ हजार रुपये पगारवाढ देण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याप्रसंगी वालमेटचे संचालक कृणाल भावसार, शिरीष राजाध्यक्ष, विश्वास लेले, ब्लेसी डिकॉस्ट्रा, सुचिता भंडारी, राजेंद्र टोके, प्रफुल जोशी, मनीष लाहोटी, रीना मुल्ला, धर्मराज्य कामगार, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजन राजे, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेश ठाकूर, सचिव समीर चव्हाण आणि स्थानिक कंपनी-कमिटीतर्फे कमलेश कोल्हे (युनिट अध्यक्ष), अविनाश बढे, लोटन येलवे (युनिट सचिव), संदीप पवार, लक्ष्मण शिंदे, मिलिंद जोशी, सुभाष देशमुख, नीलेश जगताप आदी उपस्थित होते.




























































