शहापूर, खोपोली, खालापूरला वादळी पावसाचा तडाखा; विजेचे खांब, झाडे कोसळली, पत्रे उडाले; पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहापूर, खालापूर तालुक्यासह खोपोली शहराला आज वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या परतीच्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणदाण उडाली. शहापूर, खर्डी, खोपोली, पनवेल शहरासह खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागांत विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. तर घरे व इमारतींवरील पत्रे उडाले. पावसाच्या तडाख्यात झाडांवरील असंख्य पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली. तर विजांच्या तारा तुटल्यामुळे पाच तास वीजपुरवठा खंडित झाला.

हस्त नक्षत्रातील या पावसासोबत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. काही ठिकाणी संरक्षणासाठी उभारण्यात आलेले पत्रे व शेड वाऱ्याच्या तडाख्याने उडून गेले. तर काही ठिकाणी विजेचे बांबही कोसळल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

खोपोली शहरातील चिंचवली, शेडवली, पटेलनगर, शिळगाव तसेच शहरात अनेक झाडे उन्मळून पडली. काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी विजेच्या तारांसह खांब कोसळले. शहापूर पंचायत समितीच्या आवारासह ठिकठिकाणी झाडे तुटून पडली. खर्डी-आनंदनगर रस्त्यावर झाड़ कोसळल्याने काही काळ वाहतक बंद झाली.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले, उभी पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी वादळाच्या तडाख्याने त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

वीज कर्मचाऱ्यांची धावपळ

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला. परिस्थितीची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेले विजेचे खांब पुन्हा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पावसाची पर्वा न करता वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी धावपळ करत होते.

  • शहापूरमधील जीवरक्षक टीमच्या सदस्यांची मदतकार्यासाठी धाव.
  • राहुल नगर शहापूर-आसनगाव या मुख्य रस्त्यावरच झाड पडल्याने वाहतूक ठप्प.
  • शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे व पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी घेतला नुकसानीचा आढावा.
  • शहापूर शहरातील जनकल्याण पतपेढीसमोर चार वाहनांवर झाड कोसळले.