निवडणूक आयोगाच्या डीजी आयटी सीमा खन्ना अडचणीत? महुआ मोईत्रा यांची FIR साठी तक्रार दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान महासंचालक (डीजी आयटी) सीमा खन्ना यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न होत असल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या(टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीस ठाण्याच्या एसएचओने सांगितले की ते प्रथम या प्रकरणाची चौकशी करतील.

एफआयआर दाखल करण्यासाठी काही ठोस आधार आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी ५ तारखेपर्यंतची मुदत मागितली आहे. महुआ मोइत्रा यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी त्या ६ तारखेला पोलीस ठाण्यात परत येतील. यापूर्वी, महुआ मोइत्रा यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

महुआ मोइत्रा निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना देशद्रोही असेही म्हटले होते. त्यांनी असेही म्हटले की, ज्ञानेश कुमार यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना “मतचोरी” प्रकरणी माफी मागण्यास किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते, परंतु आता ते स्वतःच दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे.

विरोधी पक्षांनी एसआयआर (SIR) मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, सीमा खन्ना यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती न देता मतदार यादीतील माहिती बदलण्यासाठी निवडणूक आयोगाच्या डिजिटल आणि आयटी प्रणालीचा (ECINet) वापर केला. या डिजिटल फेरफार आणि कथित हेराफेरीमुळे देशभरातील मतदार याद्यांमधून लाखो वैध मतदारांची नावे वगळण्यात आली.