
मालमत्तेच्या वादातून मंदिरात झोपलेल्या दोन साधूंची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. गोपाल दास आणि बिहारी दास अशी मृत साधूंची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका स्थानिक गावकऱ्याला ताब्यात घेतले आहे. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीनुसार, झोपेत असताना साधूंची हत्या करण्यात आली. त्यांचे जळालेले मृतदेह पलंगावर आढळले. साधूंच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराच्या मालमत्तेवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे वृत्त आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, इटा जिल्ह्यातही एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. पुजाऱ्याचा रक्ताने माखलेला मृतदेह मंदिराबाहेर आढळला. मंदिराचे पुजारी भोजराज यांच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुजाऱ्याचा चेहरा आणि डोके विटेने ठेचण्यात आले होते. या हत्येमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.




























































