
हिंदुस्थानातला अधिकृत मान्सून हंगाम बुधवारी संपला असून, यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, २००१ नंतरचा हा चौथा आणि १९०१ नंतरचा १३ वा सर्वात कमी पावसाचा मान्सून ठरला आहे.
दरम्यान, १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण हिंदुस्थानात ईशान्य (हिवाळी) मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिवाळ्यात परिस्थिती थोडी सुधारण्याची शक्यता आहे. या काळात तमिळनाडू, पुडुचेरी, काराईकल, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ‘सामान्य’ स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. मात्र, या पावसाचा फायदा केवळ ठराविक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहणार आहे.
दक्षिण हिंदुस्थानला दिलासा मिळण्याची शक्यता
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशातील बहुतांश भागांत ‘सरासरीपेक्षा कमी’ पावसाचा अंदाज असला, तरी उत्तर-पश्चिम हिंदुस्थानातील काही भाग (पंजाब, हरियाणाचा काही भाग, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीर) तसेच दक्षिण द्वीपकल्पीय हिंदुस्थानात ‘सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त’ पाऊस पडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, यंदाच्या उन्हाळी मान्सूनमध्ये पंजाब आणि दक्षिण हिंदुस्थानात पावसाची मोठी तूट राहिल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.




























































