आता दिवसाही गुलाबी रंगाची जादू दिसणार? ICC चा मास्टर प्लॅन, कसोटी क्रिकेटच चित्र बदलणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषद कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या लाल चेंडूचा वापर केला जातो आणि डे-नाईठ सामन्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर केला जात आहे. मात्र, यामध्ये बदल होण्याची शक्यता असून ICC त्यासंदर्भात नवीन प्लॅन तयार केला आहे.

ICC च्या नवीन प्लॅननुसार, डे-नाईट सामन्यशिवाय दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्येही गुलाबी रंगाच्या चेंडूचा वापर केला जाऊ शकतो. बऱ्याच वेळा खराब प्रकाशामुळे कसोटी क्रिकेटमधील अनेक महत्त्वपूर्ण सामने थांबवावे लागले आहेत आणि त्यामुळे दिवससुद्धा वाया जात असल्याच दिसून आलं आहे. याच पार्श्वभुमीवर खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ वाया जाऊ नये, यासाठी दोन्ही संघांच्या सहमतीने हा प्रयोग केला जाणार आहे.

या नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात ICC ने काही अटी घातल्या आहे. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच गुलाबी चेंडूच्या वापराबाबत दोन्ही संघांमध्ये एकमत होणे बंधनकारक असेल. एकदा का यावर सहमती झाली की, सामन्यादरम्यान हा निर्णय बदलता येणार नाही. तसेच, सामना सुरू झाल्यानंतर लाल चेंडूऐवजी अचानक गुलाबी चेंडू वापरण्याची किंवा चेंडू बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. सध्या ICC हा नियम किंवा प्रयोग नेमका कधीपासून लागू करणार, याबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. सध्या हा केवळ एक ट्रायल प्लॅन असून, या प्रयोगाचे निकाल कसे लागतात आणि यावर संघांची काय प्रतिक्रिया असते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.