रक्तबंबाळ अवस्थेतही प्रवाशांची चिंता; हिंदुस्थानी पायलट स्मित यांचा हल्ल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात बुधवारी घडलेल्या थरारक घटनेनंतर, हिंदुस्थानी पायलट स्मित मछार यांचा जखमी अवस्थेतील व्हिडीओ समोर आला आहे. सह-पायलटने कॉकपिटमध्ये केलेल्या हल्ल्यात स्मित गंभीर जखमी झाले. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये स्मित यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. कॉकपिटमध्येही मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसते. मात्र, गंभीर जखमी असूनही स्मित शुद्धीवर होते आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

व्हिडीओमध्ये स्मित वेदनेने त्रस्त असल्याचे दिसत असून, ते म्हणतात, ‘‘माझं डोकं दुखत आहे. खूप वेदना होत आहेत. मला उशी द्या. मला झोपायचं नाही. माझा हातही दुखत आहे.’’ त्याचवेळी ते सह-पायलटने आपल्यावर अनेक वेळा हल्ला केल्याचे सांगताना दिसतात. हात घट्ट मुठीत वळता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, विमान सुमारे 30 ते 34 हजार फूट उंचीवर असताना सह-पायलटने कुऱ्हाडीने स्मित यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर विमानाची उंची अचानक कमी होऊ लागली. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. गंभीर जखमी असूनही स्मित यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील काही प्रवासी कॉकपिटमध्ये पोहोचले आणि त्यांनी हल्लेखोर सह-पायलटला ताब्यात घेतले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सह-पायलट विमानाच्या यंत्रणेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होता.

दरम्यान, विमानातील काही ऑफ-ड्युटी पायलट्सनी परिस्थिती हाताळत सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमान उतरल्यानंतर स्मित यांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत सह-पायलटने आपल्यावर अनेकदा हल्ला केल्याचे स्मित यांनी सांगितले. ‘‘मी चालू शकतो, मात्र हात घट्ट वळता येत नाही,’’ असेही ते म्हणाले.