सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मीनाक्षी शिंदेचे नगरसेवकपद रद्द व्हावे; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला असून पूर्णेकर यांची हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला. मीनाक्षी शिंदे यांच्याकडे खूप पैसा असून याचा ईडीमार्फत तपास करण्यात यावा आणि त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे अशी मागणी वैजयंती प्रदीप पूर्णेकर यांनी केली आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे घाबरत असल्याने समोर येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या डोक्यावरील हात काढावा. मीनाक्षी शिंदे खालच्या स्तराला जाऊन काम करत असून सरकार आणि पोलिसांनी योग्य कारवाई करत पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वैजयंती पूर्णेकर यांनी केली. तसेच मीनाक्षी शिंदे यांच्याकडे अपाम पैसा असून ईडीने तपास करून कारवाई करावी. त्यांचे नगरसेवक पदही रद्द करावे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही वैजयंती पूर्णेकर यांनी केली.

दरम्यान, घटनेनंतर चार स्थानिक नगरसेवकांपैकी कोणीही सांत्वनासाठी न फिरकल्याची खंत व्यक्त करत सध्या आपण आणि आपली मुलगी घरातली प्रचंड भीतीखाली वावरत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी पूर्णेकर यांची मुलगी निशिता पूर्णेकर हिने आईच्या गळ्यात पडून टाहो फोडला.

उद्धव ठाकरे यांनी केले सांत्वन

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील निवासस्थानी जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केले. तसेच आम्ही पूर्ण ताकदीने पूर्णेकर कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले.