जाऊ शब्दांच्या  गावा – कर्करोग आणि कॅन्सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 साधना गोरे

[email protected]

एके काळी कर्करोग किंवा कॅन्सर म्हटलं की ‘मृत्यूशी गाठ’ असं मानलं जायचं. पण आता वैद्यकशास्त्रातील आधुनिक औषधांमुळे कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर पॅन्सरग्रस्त व्यक्ती पूर्ण बरी होते आणि सामान्य आयुष्य जगू शकते. औषधशास्त्रातील प्रगतीमुळे कॅन्सरग्रस्ताच्या वेदनाही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. कॅन्सर हा आजार फार प्राचीन काळापासून माणसांना आणि पशुपक्ष्यांना होत असे, पण वाढते आयुर्मान आणि आधुनिक जीवनशैली यामुळे सध्या या आजाराचं प्रमाण फार वाढलं आहे. भारतात विसाव्या शतकात अॅलोपथीचा वापर व्हायला लागल्यावर ‘कॅन्सर’ शब्दाचा परिचय झाला आणि त्याबरोबर भारतीय भाषांमध्ये त्याला पर्यायी शब्द शोधणंही सुरू झालं.

हा कर्करोग-कॅन्सर जीवघेणा आहे खरा, पण या शब्दांची माहिती तितकीच जीव रमवणारी आहे. इ.स.पूर्व 400 मध्ये ग्रीक वैद्यकशास्त्रज्ञ हिप्पोव्रेट्सने या आजाराला ‘कार्किनोस (Karkinos) म्हटलं होतं. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ ‘खेकडा’ असा होतो. पुढे लॅटिन भाषेत त्याचं भाषांतर ‘कॅन्सर’ (Cancer) असं झालं. लॅटिनमध्येही कॅन्सर म्हणजे खेकडाच. इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, रोमानियन अशा अनेक युरोपीय भाषांमध्ये हाच शब्द रूढ झाला, तर काही भाषांमध्ये खेकडा याच अर्थाचा वेगळा शब्द वापरला गेला. उदा. जर्मन (Krebs), डच (kanker), स्वीडिश (kre@fta), आइसलँडिक (krabbamein). विसाव्या शतकात भारतीय भाषातज्ञांनी आणि भारत सरकारच्या वैज्ञानिक व तांत्रिक शब्दावली आयोगाने (Commission for Scientific and Technical Terminology) इंग्रजीच्या या संकल्पनेचं ‘कर्करोग’ असं हुबेहूब भाषांतर केलं. संस्कृतमध्ये कर्क म्हणजे खेकडा. संस्कृतमध्ये कर्क, कर्कट किंवा कर्कटक म्हणजे खेकडा.

या आजाराला खेकडय़ाची उपमा का दिली गेली याविषयी वेगवेगळी स्पष्टीकरणं दिलेली आढळतात. एक म्हणजे, कॅन्सरची गाठ शरीरात वाढायला लागते तेव्हा तिच्या आजूबाजूला पसरणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा नसा हुबेहूब खेकडय़ाच्या पसरलेल्या पायांसारख्या दिसतात. जणू एखाद्या खेकडय़ाने शरीराच्या त्या भागाला आपल्या पायांनी जखडून ठेवलं आहे. दुसरं, खेकडा एखादी गोष्ट आपल्या नांग्यांनी अत्यंत घट्ट पकडून ठेवतो, तसाच हा आजार शरीराला ग्रासून टाकतो, त्यामुळे त्यातून पूर्णपणे बरं होणं कठीण होतं. तिसरं म्हणजे, खेकडा हा आक्रमक प्राणी आहे, तसा हा आजारही आक्रमक आणि वेगाने बळावणारा आहे.

पन्नास-साठच्या दशकात वैद्यकीय पुस्तकं, सरकारी आरोग्य मोहिमांची माहिती, वृत्तपत्रं आणि शालेय पाठय़पुस्तकं यांचं प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर सुरू झालं. तेव्हा ‘कॅन्सर’ ऐवजी ‘कर्करोग’ हा शब्द अधिकृत शासकीय शब्द म्हणून रूढ केला गेला. मात्र जवळपास सर्वच भारतीय भाषांमधील दैनंदिन व्यवहारात इंग्रजी ‘कॅन्सर’ हाच शब्द मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. मात्र मराठीसह हिंदी, गुजराती, पंजाबी, कानडी या भाषांमध्ये ‘कॅन्सर’चं ग्रांथिक रूप कर्करोग आहे; तर बंगाली, आसामी, उडिया, तेलुगू या भाषांमध्ये ‘कर्कट’ म्हटलं जातं.

मल्याळी भाषेत कर्करोगासाठी ‘अर्बुद’ हा संस्कृत शब्द वापरला जातो. पण हा शब्द गळू, गाठ, गोळा या अर्थाने वापरला जातो. उदा. रक्तार्बुद (रक्ताची गाठ), मांसार्बुद (मांसाची गाठ). पहिल्यापासून संस्कृतचं वर्चस्व झुगारणाऱ्या तमीळने मात्र खेकडय़ाच्या संकल्पनेपेक्षा अगदी वेगळी संकल्पना वापरून या आजारासाठी शब्द घडवला आहे. तो शब्द म्हणजे ‘पुट्र्नोई’. तामीळमध्ये पुट्र् किंवा पुर्ट्म् म्हणजे वारूळ आणि नोई म्हणजे रोग. या शब्दावर खास तामीळ भाषेचा ठसा आहे. मुंग्या किंवा वाळवी जमिनीच्या आतून हळूहळू आणि शांतपणे आपले वारूळ वाढवतात, आणि अचानक ते जमिनीवर मोठे होऊन पसरते. अगदी त्याचप्रमाणे कर्करोगाच्या (Cancer) पेशी शरीराच्या आतल्या आत नकळत आणि अनियंत्रित पद्धतीने वाढत जातात. तमीळ भाषाभ्यासकांनी कर्करोगाचा शरीरात पसरण्याचा आणि वाढण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन त्याची तुलना वारुळाशी केली. संस्कृत शब्द न वापरता तमीळ भाषकांनी या आजाराचं अचूक स्वरूप लक्षात घेऊन अत्यंत विचारपूर्वक हा शब्द तयार केल्याचं लक्षात येतं.

अरबी, फारसी या भाषांमध्ये कर्करोगाला ‘सरतान’ असा शब्द आहे. सदर भाषांमध्ये या शब्दाचा अर्थही खेकडा असाच आहे. थोडक्यात, असाध्य आणि आक्रमक अशा कर्करोगाचं स्वरूप सांगताना खेकडा, वारूळ ही रूपपं वापरून त्याचं नामकरण केलं गेलं. या आजारावर परिणामकारक आणि कमी त्रासदायक औषधोपचार यावेत आणि कर्करोगग्रस्तांना स्वास्थ्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावं म्हणून आशा व्यक्त करणं इतपंच आपल्या हातात आहे. पुढील लेखात कर्क रास, कर्कवृत्त आणि कर्कटक या शब्दांच्या गमती समजून घेऊया!