
ओव्हरटेक करताना व्होल्वो बस ट्रेलरला धडकल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर चार गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर लिंक एक्सप्रेसवर शुक्रवारी पहाटे 5 वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त बस दिल्लीहून बिहारला चालली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा आणि अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. अपघातानंतर गोरखपूर लिंक एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बचाव पथकांनी अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक पूर्ववत केली. ओव्हरटेकिंग करताना बस चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात कळले.
























































