समुद्री महामार्गावर भीषण अपघात; नवरात्रोत्सवासाठी देवीची मूर्ती आणताना टेम्पो आणि ट्रकची धडक, 7 ठार, 19 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्री महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे स्टेशनजवळ ट्रक आणि टेम्पोची पिकअप यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सिंदी मेदे येथील दुर्गा माता मंडळाचे कार्यकर्ते नवरात्रौत्सवासाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आले होते. देवीची मूर्ती वर्ध्याकडे घेऊन जात असताना धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची टेम्पो पिकअपसोबत जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की टेम्पोचा पार चक्काचूर झाला असून मंडळाच्या 7 कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर टेम्पो आणि ट्रकमध्ये अडकलेल्या 19 जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांना तात्काळ वर्ध्याच्या सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी 4 ते 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी दिली आहे. तसेच निकेतन कदम आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या उपचाराची पाहणी केली आणि विचारपूस केली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातातील मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून पोलीस तपास करत आहेत.