
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्याकांडाने ठाणे हादरले असून हजारो शिवसैनिकांनी बुधवारी रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्याला घेराव घालत केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने आज या हत्याकांडाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे विशेष तपास पथक काम करणार असून त्यात 23 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले.
प्रदीप पुर्णेकर यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणातील पाच आरोपींपैकी पप्या शिंदे या आरोपीला अटक झाली असून चार आरोपी अद्यापही फरार आहेत. मानपाडा येथील गणेशनगरातील घटनास्थळी आज एसआयटीचे पथक दाखल झाले. तेथील पाहणी करून महत्त्वाचे पुरावे एसआयटी पथकाने गोळा करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एका पथकाने समतानगर येथे जाऊन तपास केला. यावेळी पोलिसांनी दोन मोटरसायकल जप्त केल्या. त्यापैकी एक दुचाकी, चौथा आरोपी नितेश पवार याच्या भाच्याच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक माहितीनुसार हत्येनंतर मारेकरी मोटरसायकलवरून समतानगरात आले, तेथे मोटरसायकल्स सोडून तेथून ते कारमधून फरार झाले. एसआयटीच्या पथकाने ती कार कोणत्या दिशेने गेली याचा तपास सुरू केला आहे.
महाराष्ट्राबाहेरही तपासाची व्याप्ती वाढणार
सध्या एसआयटीची टीम सीसी टीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि घटनास्थळी मिळालेल्या धागेदोरांच्या आधाराने आरोपींचा शोध घेत आहेत. गरज लागली तर हे पथक तपासाची व्याप्ती महाराष्ट्राबाहेरही वाढवणार, असे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
पप्या शिंदेला 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
पप्या शिंदे याला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
अशी असेल टीम
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील या विशेष तपास पथकात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आठ पोलीस कर्मचारी असा एकूण 23 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
पुर्णेकर हत्या प्रकरणातील चार आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यापैकी पप्या शिंदे याच्याविरुद्ध आठ ते नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस म्हणाले. त्याला 2014 मध्ये तडीपार करण्यात आले होते. इतर आरोपींचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुह्यांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
एसआयटीच्या पथकाने समतानगर येथे जाऊन पाहणी केली व पुर्णेकर हत्याकांडाचे धागेदोरे तपासले.
मीनाक्षी शिंदे आणि त्यांचा नवरा अजूनही मोकाट
ठाणे क्राईम बँचने बुधवारी रात्री उशिरा मीरागाव येथील मीरा पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या एका इमारतीतून तीन महिलांसह पाचजणांना ताब्यात घेतले. हे पाचही जण पुर्णेकर यांच्या हत्याकांडाआधी पप्या शिंदे याच्या संपर्कात होते. या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हत्याकांडाचे सूत्रधार शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचा नवरा राजेंद्र शिंदे हे आहेत. ते अजूनही मोकाट फिरत आहेत, असा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी पुर्णेकर यांचे पुत्र राम यांनी केली.





























































