आज ‘सीजेपी’चे मुंबईत ‘जेल भरो’! शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील निवडणूक घोटाळ्याचे कथित सूत्रधार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘सीजेपी’कडून आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आंदोलन करणारच असल्याचे आज ‘सीजेपी’चे अभिजित दीपके यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आजच्या शिवाजी पार्कवरील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. मोठय़ा संख्येने शिवसैनिक या आंदोलनात उतरणार आहेत.

मतदार फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया राबवण्यापासून निवडणुकीशी संबंधित विविध निर्णय घेताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या मनमानीचे अनेक पुरावे समोर आले आहेत. ज्ञानेश कुमार यांचे भाजपशी असणारे लागेबांधेही समोर आले आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात तीव्र रोष व्यक्त होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सीजेपीने आंदोलन पुकारल्याचे दीपके यांनी गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कवर आंदोलन करू शकतात, मग आम्ही का करू शकत नाही? असा सवालही दीपके यांनी यावेळी उपस्थित केला. पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी आंदोलन होणारच असल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात नागरिकांनीही सहभागी व्हावे. तुम्ही कुठल्याही पार्टीचे झेंडे न आणता आम्हाला सपोर्ट करू शकता, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी होणार

सीजेपीच्या आंदोलनाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. लोकशाही रक्षणार्थ होत असलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेने ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

सीजेपीच्या चार मागण्या

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करावा.

‘एसआयआर’ प्रकियेत त्रुटी असल्याने 2025ची ‘एसआयआर’ यादी गोठवावी.

आगामी निवडणुका नवीन यादीऐवीजी जुन्या 2025च्या यादीनुसार घ्याव्यात.

भविष्यात निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पारदर्शक आणि स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी.

…तरी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन!

आम्ही लोकशाही मानतो. संविधानाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आंदोलन थांबणार नसल्याचे दीपके यांनी जाहीर केले आहे. ‘मुख्यमंत्री साहेब, मला तीन दिवस नाही तर तीन महिने जेलमध्ये टाका! तरी मी रस्त्यावर पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,’ असे आव्हानही दीपके यांनी दिले आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार आहेत. त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस लावायला हवेत. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला नाही तर देशभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

शिवसेना-मनसेच्या मोर्चाला पाठिंबा

शिवाजी पार्कवर होणाऱ्या ‘सीजेपी’च्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच पाठिंबा जाहीर केला आहे. तर ‘ज्ञानेश कुमार हटवा’ या मागणीसाठी आणि भ्रष्ट निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना आणि मनसेकडून मुंबईत रविवारी विराट जनमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला ‘सीजेपी’चे अभिजित दीपके यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

स्थळ – शिवाजी पार्क, गेट क्र. 6

वेळ – सायंकाळी 4 वाजता