
हिंदुस्थानी मल्ल नितेश सिवाच याचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजयरथ अखेर यजमान जपानच्या युरी नाकाजातो याने रोखला. ग्रीको-रोमन पुस्तीत पुरुषांच्या 97 किलो गटाच्या अंतिम लढतीत नितेशला 0-4 असा पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, ग्रीको-रोमन पुस्तीत हिंदुस्थानची सुवर्णपदकाची दीर्घकाळची प्रतीक्षाही कायम राहिली.
नितेशने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाकाजातोने त्याचा प्रत्येक डाव हाणून पाडला. पहिल्या सत्राच्या अखेरीस जपानी मल्लाने 2-0 अशी आघाडी घेतली. नितेशला निष्क्रियतेमुळे ग्राउंड पोझिशनमध्ये जावे लागले; मात्र त्याने शानदार बचाव करत प्रतिस्पर्ध्याला गुण मिळवू दिले नाहीत. यानंतर नाकाजातोने नितेशचा तोल बिघडवत टेकडाऊन साधला आणि आघाडी 4-0 केली. सामना संपण्यास अवघा एक मिनिट शिल्लक असताना नितेशकडून जोरदार प्रतिहल्ल्याची अपेक्षा होती; मात्र नाकाजातोने त्याला संधीच दिली नाही.
ग्रीको-रोमन पुस्तीत हिंदुस्थानला अखेरचे आशियाई सुवर्णपदक 1962मध्ये मिळाले होते. त्यामुळे नितेशकडून मोठय़ा अपेक्षा होत्या; मात्र सुवर्णाच्या उंबरठय़ावरच त्याची झुंज थांबली.
मानसीचे कांस्य हुकले
महिलांच्या 62 किलो गटात हिंदुस्थानच्या मानसीला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. मंगोलियाच्या अल्ताजिन तोगतोखने मानसीवर 5-2 अशी मात केली. मंगोलियन मल्लाने सुरुवातीला 2-0 अशी आघाडी घेतली होती. मानसीने जोरदार पुनरागमन करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. मात्र, त्यानंतर अल्ताजिनने पुन्हा आक्रमक डावपेच आखत सामना आपल्या बाजूने झुकवला आणि मानसीच्या कांस्यपदकाच्या आशेवर पाणी फेरले.






















































