
मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे सततच्या ब्लॉकमुळे सुरू असलेले हाल लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. टिटवाळय़ातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मोठा ब्लॉक घेतल्यानंतर आता आसनगाव–कसारादरम्यानच्या तिसऱया मार्गिकेसाठी 7 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबरपर्यंत 12 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक काळात अनेक लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस गाडय़ांचे वेळापत्रक बिघडणार आहे.
आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामासाठी कसारा येथे 12 दिवसांचा विशेष ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक टप्प्याटप्प्याने घेतला जाणार असून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी 7 ते 9 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत केलेला बदल जाहीर केला. त्यानुसार 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.35 ते 8.35 वाजेपर्यंत तसेच 9 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
या ब्लॉकमध्ये कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारादरम्यानची ‘अप’ मेन लाईन आणि ‘डाऊन’ मेन लाईन तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 3, 4 आणि ‘अप’ यार्डचाही समावेश आहे.
ब्लॉक काळात आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाराच्या दिशेने येणाऱया काही गाडय़ांचा प्रवास आसनगाव येथे समाप्त होणार आहे, तर काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यात लोकल सेवेचे वेळापत्रक विस्कळीत होणार असल्याने नोकरदार प्रवाशांची घरी परतण्याच्या मार्गावर रखडपट्टी होण्याची चिन्हे आहेत.
तीन दिवसांत 37 एक्सप्रेस गाड्यांच्या सेवेवर परिणाम
7 ते 9 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 37 मेल-एक्सप्रेस गाडय़ांच्या सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱया काही गाडय़ांचे वेळापत्रक बदलले जाणार असून अनेक गाडय़ा ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात येणार आहेत. त्याचा परिणाम मागून येणाऱया गाडय़ांवर जाणवणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांचीही ब्लॉक काळात मोठी गैरसोय होणार आहे.
























































