
सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक असलेल्या ठाणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. पुनर्विकास तसेच क्लस्टर प्रकल्पांमध्ये मोठे अर्थकारण आहे. त्यातून संघर्ष होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रदीप पुर्णेकर यांची झालेली हत्या ही गंभीर बाब असून या हत्याकांडाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
संजय केळकर यांनी प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठाणे शहरात अशा प्रकारची हत्या होणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. राजकीय वैमनस्य किंवा हेव्यादाव्यांतून असे कृत्य घडत असेल तर त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे नमूद करताना या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याची गरज
पुर्णेकर हत्याप्रकरणी तपासाच्या कक्षेत येणाऱया प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याची गरज असून कोणतीही माहिती लपवली अथवा दाबली जात असल्याचा जनमानसात समज निर्माण होता कामा नये. ज्यांच्याबाबत संशय किंवा माहिती असेल, त्यांना चौकशीसाठी बोलवा, असेही केळकर म्हणाले.
वर्चस्व आणि संघर्षाची शक्यता
आगामी काळात ठाणे शहरात पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंटची प्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर सुरू होणार आहे. त्यामुळे कोणाला काम मिळणार, कुणाचे वर्चस्व राहणार, यावरून संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये मोठे अर्थकारण असल्याने योग्य ती तपासणी होणे गरजेचे आहे, असे केळकर यांनी सांगितले.
























































