
हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाने कट्टर व पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 4-3 गोलफरकाने धूळ चारत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. सामन्याच्या अखेरच्या 49 सेपंदांत अभिषेकने केलेला मैदानी गोल हिंदुस्थानच्या विजयाचा निर्णायक ठरला. हिंदुस्थानकडे एक वेळ 3-0 अशी आघाडी असतानाही पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला होता. मात्र, अखेरच्या क्षणी अभिषेकने गोलचा घाव घालत पाकिस्तानच्या आशा उद्ध्वस्त केल्या.
हिंदुस्थानने सलग दुसऱयांदा आशियाडच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, महिला संघानेही अंतिम फेरी गाठल्याने हिंदुस्थानी हॉकीसाठी सुवर्णपदकाची दुहेरी संधी निर्माण झाली आहे. हिंदुस्थानने पहिल्याच क्वार्टरपासून पाकिस्तानवर आक्रमणाचा मारा सुरू केला. पाचव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी का@र्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंहने गोल करत हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर 13व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी का@र्नरवर हरमनप्रीतने गोल करत हिंदुस्थानची आघाडी 2-0 केली. दुसऱया क्वार्टरमध्ये 23व्या मिनिटाला सुखजीत सिंहने मैदानी गोल करत हिंदुस्थानला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र, पाकिस्तानने हार मानली नाही. दुसऱया क्वार्टरच्या अखेरीस 30व्या मिनिटाला अबू महमूदने पेनल्टी का@र्नरवर गोल करत पाकिस्तानचे खाते उघडले. मध्यंतराला हिंदुस्थान 3-1ने आघाडीवर होता.
तिसऱया क्वार्टरमध्ये पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला. 45व्या मिनिटाला हनन शाहिदने मैदानी गोल करत हिंदुस्थानची आघाडी 3-2 अशी कमी केली. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच 49व्या मिनिटाला वहीद राणाने गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. हिंदुस्थानच्या हातातून विजय निसटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण अखेरच्या क्षणी हिंदुस्थानी खेळाडूंनी संयम राखला. सामना संपण्यास अवघे 49 सेपंद शिल्लक असताना अभिषेकने मैदानी गोल करत हिंदुस्थानला 4-3 अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाकिस्तानला बरोबरी साधण्याची कोणतीही संधी न देता हिंदुस्थानने विजयावर शिक्कामोर्तब केले.






















































