
एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणीचा वाद आज पुन्हा उफाळून आला. वारंवार सूचना देऊनही 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणीत माल आणला जात असल्याने माथाडी कामगांरानी काम बंद केले. जास्त वजनाच्या गोणी उतरवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे कांदा आणि बटाटा भरून आलेल्या सुमारे 40 ट्रकमधील माल आज खाली झाला नाही. या मालाची रखडपट्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यातच माथाडी कामगारांनी अचानक आंदोलन पुकारल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जास्त वजनाच्या गोणी उचलल्यामुळे माथाडी कामगारांना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. पाठदुखी आणि गुडघेदुखीच्या त्रासाने शेकडो कामगार बेजार झाले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या सर्वच मालाच्या गोणींचे वजन 50 किलोच्या आत ठेवण्याच्या सूचना पणन विभागाने दिल्या आहेत. या सूचनांचे पालन नवी मुंबई एपीएमसीच्या सर्वच मार्केटमध्ये सक्तीचे करण्यात आले आहे. धान्य, फळे, भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्ये ओझी आणि गोणीचे वजन 50 किलो असले तरी कांदा-बटाटा मार्केटमध्ये अद्यापही 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी येत आहेत. याविरोधात माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा जास्त असलेली एकही गोणी ट्रक आणि टेम्पोमधून उतरून घेतली नाही. त्यामुळे कांदा आणि बटाट्याचे सुमारे 40 ट्रक तसेच उभे राहिले. या ट्रकमधील माल पडून राहिला. माथाडी कामगारांच्या या आंदोलनाचा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला.
गोणीचे वजन 50 किलोपर्यंत ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी त्याचे पालन सर्वच बाजार समित्यांमध्ये केले जात नाही. नवी मुंबई एपीएमसीत राज्यातील अन्य बाजारपेठांतून मोठ्या प्रमाणात माल येतो. त्यामुळे काही वेळेस गोणीचे वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असते, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांदा आणि बटाट्याच्या गाड्यांची रखडपट्टी झाली. लसणाच्या गोणी मात्र माथाडी कामगारांनी खाली केल्या. लसणाच्या गोणीचे वजन हे 50 किलोपेक्षा कमी आहे.
सर्वच गाळ्यांवर काम बंद नव्हते
कांदा-बटाटा मार्केटमधील सर्वच व्यापाऱ्यांना 50 किलो वजनाच्या गोणीतून शेतमाल मागवण्याच्या सूचना एपीएमसी प्रशासनाने केल्या आहेत. मात्र काही व्यापारी या सूचनांचे पालन करीत नाहीत. त्यांना अनेक वेळा माथाडी युनियनच्या वतीनेही समज देण्यात आली होती. मात्र त्यांनी 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी मागवणे सुरू ठेवल्यामुळे आज त्यांचा माल उतरवला गेला नाही. अन्य गाळ्यांवर काम सुरू होते. 50 किलोपर्यंत वजनाच्या सर्व गोणी माथाडी कामगारांनी उतरवून घेतल्या आहेत, अशी प्रतिक्रिया माथाडी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी व्यक्त केली आहे.


























































