एसआयआर, ज्ञानेश कुमारांवरून दिल्लीत रणकंदन, ‘आप’चे नेते, कार्यकर्ते यांची धरपकड; इंटरनेट सेवा, 11 मेट्रो स्थानकं बंद, जंतरमंतरवर मोठा फौजफाटा तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. गांधीजयंतीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. मात्र सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्याचे प्रयत्न सुरू केले असून आपचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच दिल्लीत कलम 163 लागू करण्यात आले असून जमावाला एकत्र येण्यास आणि निदर्शने करण्यास बंदी घातली आहे.

मतचोरी आणि ‘एसआयआर’ घोटाळ्यास जबाबदार असलेल्या ज्ञानेश कुमारांना मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून हाकला, तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजाची आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेची चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी दिल्लीत इंडिया आघाडीसह विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र आंदोलन करण्यावर संघटना ठाम होत्या.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले. परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. कलम 163अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आंदोलनस्थळी जमण्यावर मर्यादा आल्या. यावेळी आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी आंदोलकांना पोलिसांना घाबरू नका, असे आवाहन केले. पोलिसांनी लाठीमार केला तरी घाबरू नका, असे ते म्हणाले. याच दरम्यान पोलिसांनी सौरभ भारद्वाज यांच्यासह आपचे अन्य नेते आणि आंदोलकांना जंतरमंतर परिसरातून हटवले. पक्षाचे नेते संजीव झा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. भारद्वाज यांनी बसमधून एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये अनेक आंदोलक बसमध्ये बसलेले असून पोलीस कर्मचारीही दिसत आहेत.

11 मेट्रो स्थानकं बंद

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी गर्दी जमू नये म्हणून दिल्लीतील मेट्रो स्थानकंही बंद करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने 11 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जनपथ, पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, राजीव चौक, सेवा तीर्थ, मंडी हाऊस, लोक कल्याण मार्ग, आयएनए, चावडी बाजार, रामकृष्ण आश्रम मार्ग आणि नवी दिल्ली ही मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.