
रोजगार हमी योजनेची ग्रामीण भागात यशस्वीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीनिहाय सरकारने रोजगार सहाय्यक नेमले आहेत. मात्र ५१२ सहाय्यकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाची फुटकी कवडीही मिळालेली नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास शनिवार ३ ऑक्टोबरपासून पालघर जिल्ह्यात ‘कामबंद’ आंदोलन करण्याचा इशारा रोजगार सहाय्यक संघटनेने दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत रोजगार सहाय्यकांची भूमिका महत्त्वाची आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी, मजुरांशी संबंधित नोंदी आणि योजनेच्या दैनंदिन कामकाजात रोजगार सहाय्यकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यासाठी त्यांना अंदाजे २५ हजार रुपये दरमहा मानधन दिले जाते. मात्र या कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन तुटपुंजे असून तेही सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे रोजगार सेवकांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
थकीत मानधन लवकरात ल वकर मिळावे तसेच त्यात वाढ करावी या मागणीसाठी रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मानधनासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न कायम राहत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन तातडीने अदा करून रोजगार सहाय्यकांना न्याय द्यावा, असे साकडे जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे.
२ ऑक्टोबरपर्यंत हा प्रश्न मार्गी न लावल्यास पालघर जिल्ह्यातील सर्व ५१२ रोजगार सहाय्यक कामबंद आंदोलन छेडतील, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. रोजगार सहाय्यकांची उपासमार होत असून त्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र रोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष जयराम नडगे यांनी केली आहे.

























































