
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आलेला असतानाच, दुसरीकडे उमेदवारी अर्जांच्या विक्रीने विक्रम गाठल्याने सहकारातील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या चार दिवसांत विक्रमी 846 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. आज अर्ज दाखल करण्यासाठी दिग्गज नेते, खासदार, आमदार आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱयांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बिनविरोधच्या चर्चेपेक्षा निवडणुकीच्या रणधुमाळीचेच चित्र अधिक स्पष्ट होत आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 28 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 28 आणि 29 सप्टेंबर रोजी 531 अर्जांची विक्री झाली होती. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी आणखी 166 अर्जांची विक्री झाली. त्यामुळे आतापर्यंत विक्री झालेल्या अर्जांची संख्या 846 वर पोहोचली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज मोठय़ा संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
आज खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, महानगर बँकेच्या अध्यक्षा गितांजली शेळके, माजी संचालक प्रशांत गायकवाड, राहुरीचे हर्ष अरुण तनपुरे, अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार किरण लहामटे, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, श्रीगोंद्यातून नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे, कर्जतमधून अंबादास पिसाळ, जामखेडमधून अमोल राळेभात, अहिल्यानगरमधून जि. प. चे माजी सदस्य बाळासाहेब हराळ आणि जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षा जयमाला भारत सोले-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड, माजी संचालक राहुल जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत प्रमुख राजकीय घराण्यांसह सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे.
एकाच व्यासपीठावर विखे-शिंदे; जिल्हा बँकेचा विषय मात्र गायब!
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जामखेड येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील आणि सभापती राम शिंदे हे एकाच व्यासपीठावर आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कोणताही विषय पुढे आला नाही. दोघांमध्ये काही वेळ कानगोष्टी झाल्याचे चित्र दिसले असले, तरी त्यापलीकडे कोणतीही राजकीय चर्चा झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे विखे-शिंदे यांच्यातील राजकीय दुरावा कमी झाला की कायम आहे, याबाबत चर्चा सुरू होती.
व्यक्तिद्वेषातून बिनविरोधचा घाट घातला तर निवडणूक होणारच
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रमुख नेत्यांच्या पातळीवर हालचाली सुरू असतानाच, खासदार नीलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोधच्या राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘जिल्हा बँकही शेतकऱयांची कामधेनू आहे. जिह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. मात्र, व्यक्तिद्वेष ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, तर ती बिनविरोध होणार नाही,’ असा स्पष्ट इशारा लंके यांनी दिला. प्रमुख मंडळींनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले, तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे लंके यांनी सांगितले.
दुष्काळामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, याबाबत सर्वांचेच मत आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांच्या बैठकीत निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शेतकरी संकटात असताना त्याच्या आर्थिक आधार असलेल्या संस्थेची निवडणूक केवळ राजकीय मतभेद आणि व्यक्तिगत समीकरणांमुळे लावणे योग्य नाही, अशी भूमिकाही खासदार लंके यांनी मांडली.


























































