
चुकून विमानातील आपत्कालीन दरवाज्याच्या हँडलला प्रवाशाचा हात लागला आणि अलार्म वाजू लागला. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर सदर प्रवाशाला विमानातून खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी प्रवाशाकडून लेखी पत्र घेऊन त्याला सोडून दिले. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी ही घटना घडली. इंडिगोचे विमान हैदराबादहून कडपा येथे चालले होते. विमानात प्रवेश केल्यानंतर आपल्या जागेवर बसत असताना प्रवाशाचा चुकून आपत्कालीन दरवाज्याच्या हँडलला हात लागला. यामुळे सेन्सर अलार्म वाजला. अलार्म वाजल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. त्यानंतर विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला विमानातून खाली उतरवले. चौकशीसाठी त्या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने अनवधानाने आपत्कालीन निर्गमन दरवाजाला स्पर्श केला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याला सोडून देण्यापूर्वी त्याच्याकडून एक लेखी पत्र (स्पष्टीकरण) घेण्यात आले. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.






























































