
एकीकडे संपूर्ण सोलापूर जिह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पाण्यासाठी शेतकरी आणि गावकऱयांना वणवण भटकावे लागत असतानाच, दुसरीकडे मात्र दुष्काळग्रस्त माळशिरस तालुक्यात उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कालवा ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहून जात असतानाही अधिकाऱयांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवा सेनेचे गणेश इंगळे यांनी केला आहे.
वारंवार तक्रारी करूनही पाण्याचा अपव्यय थांबत नसल्याने संतप्त युवासैनिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यात उतरून अंघोळ करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. युवासेनेचे गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
एकीकडे पाण्यासाठी सोलापूर जिह्यातील तुळशी गाव विकण्याची वेळ आलीय आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जातेय. त्यामुळे प्रशासनाच्या या कारभाराविरोधात शेतकऱयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कालव्यातून होणारा हा पाण्याचा अपव्यय तत्काळ थांबवला नाही, तर युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गणेश इंगळे यांनी दिला आहे. यावेळी शुभम भोई, गणेश इंगळे, अमित भोई, प्रशांत पराडे, सुरेश पराडे, अक्षय पराडे, अविनाश भोई, बापू भोई आदी उपस्थित होते.





























































