सिगारेट आणण्यास नकार देणाऱ्या तरुणासह दोघांवर चाकूने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका १९ वर्षीय तरुणासह त्याच्या आतेभावावर चाकू आणि फायबर रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड परिसरात घडली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

म्हाडा सोसायटी परिसरात राहणारा रौनक आकाश सिंग (१९) हा शुक्रवारी रात्री साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास गौरव सिटी इमारतीजवळील लुडो किंग्ज लॉंजजवळ उभा होता. त्यावेळी आरोपी भोला सिंग (१९) याने रौनकला सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र रौनकने सिगारेट आणण्यास नकार दिल्याने भोला सिंग संतप्त झाला. यानंतर भोला सिंग आणि त्याचा साथीदार आयुष सिंग (१८) यांनी रौनकला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रौनकने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता भोला सिंग याने हातातील चाकूने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. भांडण सोडवण्यासाठी रौनकचा आतेभाऊ इशांत याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले.