
>> सिद्धेश्वर मारटकर
स्नेहल प्रकाशनाद्वारे देण्यात येणारा स्नेहांजली पुरस्कार या वर्षी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक यांना दिला जाणार आहे. यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचे पैलू मांडणारा हा लेख.
ताईंचा माझा परिचय 2001 सालापासूनचा. स्व. शाहू मोडक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 2001 चा पुरस्कार मला जाहीर झाला. स्वत: प्रतिभाताईंनी मला फोन करून त्यांच्या मोगल गार्डनमधील फ्लॅटवर त्यांना भेटण्यासाठी बोलावलं. ती त्यांची पहिली भेट अजूनही स्मरणात आहे.
आपले काही पूर्वसंचित भक्कम असल्याशिवाय अशी माणसे (देवमाणसे) आपल्या आयुष्यात येत नसतात. त्यांची भेट व त्यांनी दिलेला पुरस्कार जीवनाला नवी कलाटणी देणारा ठरला. 25 एप्रिल 2001- माझ्या आयुष्यातील एक चमत्कार होता. मा. वा. ल. मंजूळ यांनी त्यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली होती. पुरस्काराच्या दिवशी महाराष्ट्र बंद होता. ताईंचा सकाळी फोन आला. ताई म्हणाल्या, ‘मारटकर तुमचे दुर्दैव आहे की, दरवर्षी आपल्या 25 एप्रिलच्या कार्पामाला बालगंधर्व भरलेले असते, मात्र या वर्षी बंदमुळे कमी लोक येतील.’ त्यावेळी मी उत्स्फूर्तपणे उत्तर दिले, ‘ताई, शाहू मोडक यांच्या पत्रिकेत चंद्र-गुरू शुभ योग आहे. तसेच माझ्याही पत्रिकेत आहे व आज कार्पामाच्या दिवशीसुद्धा चंद्र-गुरू शुभयोग असल्यामुळे आज लोक बाल्कनीतसुद्धा बसतील.’ आणि झाले तसेच. त्या कार्पामाला खालचा हॉल पूर्ण भरून बाल्कनीतसुद्धा लोक बसले होते, तर काही लोक उभे होते. या माझ्या भविष्याचा उल्लेख ताईंनी भर कार्पामात सांगितला होता. नंतर कळलं की, ताईंच्या पत्रिकेतसुद्धा लाभस्थानी चंद्र-गुरू योग आले. त्यामुळे ताईंच्या प्रत्येक कार्पामाला मोठी गर्दी असते. ताईंचा आजपर्यंत कोणताही कार्पाम फसला नाही.
त्यांच्या पत्रिकेतील चंद्र-गुरू योगामुळे त्यांचा प्रचंड लोकसंग्रह निर्माण झाला आहे. काही ठराविक व्यक्ती अनेक वर्षं ताईंच्या सहवासात आहेत. त्यांपैकी मी एक असल्याचा मला अभिमान वाटतो. ताईंनी पण माझ्यावर मोठय़ा बहिणीसारखे नि:स्सीम प्रेम केले आहे. माझ्या सुख-दु:खात ताईंची असणारी साथ मोलाची ठरली आहे. पुणे, मुंबई, नाशिकपासून अमेरिकेपर्यंत ताईंचे स्नेही आहेत. अनेक दिग्गज ताईंच्या एका शब्दावर कोणतीही मदत करायला तयार असतात. ताईंचा आशीर्वाद व सेवेचा लाभ मिळावा यासाठी असंख्य व्यक्ती ताईंच्या संपर्कात आहेत.
माझ्या मते ताईंमध्ये सर्वांना शाहूरावांच्या बरोबर म्हणजे साक्षात कृष्णाबरोबर संसार केलेली ‘रुक्मिणी’ दिसते. एक दैवी शक्तीचा अनुभव ताईंच्या सहवासात अनुभवास येतो. माझ्यासह अनेक जणांची सुख-दु:खं व्य्यक्त करण्यासाठी ताईंसारखी दुसरी जागा शोधून सापडणार नाही.
ताईंची भेट म्हणजे एक प्रकारची ऊर्जा घेऊन प्रत्येकजण जात असतो. तसेच ताईंनाही प्रत्येक व्यक्ती काही ठराविक दिवसांनी भेटलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. अशा खूप कमी व्यक्ती त्यांच्याभोवती आहेत. त्यांपैकी मी एक आहे. दर 15 दिवसांनी भेटण्याचा मी प्रयत्न करतो. पण काही कारणांनी उशीर झाला की ताईंचा हमखास फोन येतो.
माझ्या एका कठीण प्रसंगात ताईंनी खंबीरपणे दिलेली साथ माझ्यासाठी इतकी महत्त्वाची होती की, एकाक्षणी एका मोठा गट माझ्या विरोधात होता त्यावेळी ताईंनी सगळ्यांना घरी बोलवून त्यांची कानउघाडणी केली होती. तो क्षण मी कधी विसरू शकणार नाही.
अशा अनेकांना ताईंनी आधार दिला आहे. त्यांनी अनेकांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यांच्या घरी स्व. शाहूरावांच्याकडे असलेल्या गणेश प्रतिमेसमोर उभे राहून त्या जेव्हा आपल्यासाठी प्रार्थना करतात त्यावेळी आपले सगळे प्रॉब्लेम संपले याची जाणीव होते.
कलियुगामध्ये प्रत्यक्ष देवाचे दर्शन मिळणे शक्य नसते, मात्र ताईंच्या सहवासात एका देवीचे दर्शन झाल्याची अनुभूती येते. प्रत्येकावर नि:स्वार्थी प्रेम करणे, त्याच्या सुखदु:खाची चौकशी करणे, त्यांना मानसिक आधार देणे यामुळे प्रत्येकाला ताई म्हणजे परमेश्वर आपल्या पाठीशी आहे याची जाणीव होते.
अशा व्यक्तींचा सहवास मिळणे म्हणजे आपल्या पूर्वकर्मातील पुण्याचाच भाग म्हणावा लागेल. त्यांचे जीवन म्हणजे मोक्ष मिळविणाऱ्या एका साध्वीचा जीवनपट म्हणावा लागेल. ज्यांना मोक्ष मिळावा असे वाटत असेल त्यांनी ताईंसारखे जगण्याचा प्रयत्न करावा. यानिमित्ताने ताईंचा यापुढे अनेक वर्षं सहवास मिळावा व त्यांनी वयाची 100 वर्षं पूर्ण करावीत. त्याबरोबर उत्तम आरोग्याची साथ मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.
(लेखक ज्योतिर्विद आहेत.)




























































