
>> उत्तरा मोने
अंधत्व लाभलेले असतानाही केवळ इच्छेच्या जोरावर सौंदर्यशास्त्राचा ध्यास घेत स्वतःला घडवणारी डॉ. उर्वी जंगम. जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहाणं आयुष्याला वेगळं वळण देतं हेच तिच्या प्रवासातून लक्षात येते.
आपण एखाद्या सुंदर फुलाकडे पाहतो, सूर्यास्त पाहतो, एखादं चित्र पाहतो आणि सहज म्हणतो-‘किती सुंदर!’ पण ज्या व्यक्तीला हे दिसत नाही, ती सुंदरता अनुभवत नसेल का? नक्कीच अनुभवत असेल. फक्त तिच्या अनुभवाची वाट वेगळी असेल. हीच वेगळी वाट शोधत, त्या वाटेला विचारांची, संशोधनाची आणि ज्ञानाची भाषा देत पुढे जाणारं नाव म्हणजे डॉ. उर्वी जंगम. उर्वीचा प्रवास सांगताना ‘अंध असूनही तिने हे करून दाखवलं’ एवढंच म्हणणं तिच्यावर अन्यायच ठरेल. कारण तिची गोष्ट केवळ अडथळ्यांवर मात करण्याची नाही; तर जगाकडे पाहण्याची आपलीच पद्धत नव्याने तपासून पाहण्याची आहे.
जर्मन स्टडीजमध्ये पीएच.डी. मिळवणारी भारतातील पहिली अंध महिला म्हणून उर्वीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. पण त्या एका टप्प्यामागे कित्येक वर्षांचा अभ्यास, संशोधन, परदेशातलं स्वतंत्र आयुष्य, भाषेचा ध्यास आणि सतत पडणारे प्रश्न होते. तिच्या मनातला एक साधा पण फार मोठा प्रश्न होता-सौंदर्य म्हणजे नेमकं काय? या प्रश्नातून उर्वीच्या संशोधनाला दिशा मिळाली-‘अदृश्य रस’, म्हणजेच non-visual aesthetics. ऐकणं, स्पर्श, वास, चव, कल्पनाशक्ती, स्मृती आणि अंतर्मन यांच्या माध्यमातून सौंदर्याचा अनुभव कसा तयार होतो, याचा तिने शोध घेतला. याच संशोधनाचं पुढचं पाऊल म्हणजे तिचं जर्मन भाषेतील पुस्तक Eine osthetik des Nicht-Visuellen. 2022 मध्ये जर्मनीतून प्रकाशित झालेलं हे पुस्तक तिच्या दीर्घ संशोधन प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा ठरलं.
पण या सगळ्यामागे एक वेगळीच गोष्ट आहे-जर्मनीतलं तिचं आयुष्य. DAAD शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर उर्वी जवळजवळ सहा वर्षं जर्मनीत राहिली. परकी भाषा, परकी संस्कृती, नवीन माणसं आणि त्यात स्वतचं सगळं आयुष्य स्वतंत्रपणे सांभाळणं. अंध व्यक्तीसाठी ही रोजचीच एक नवी परीक्षा असू शकते. पण उर्वीने त्या अनुभवांकडे केवळ अडचणी म्हणून पाहिलं नाही. उलट, त्या अनुभवांनीच तिच्या विचारांना नवी धार दिली. 2011 मध्ये ट्युबिंगेन विद्यापीठात शिकण्याची संधी मिळाली तेव्हा ती त्या गटातील एकमेव भारतीय आणि एकमेव अंध विद्यार्थिनी होती. भारतामध्ये परतल्यानंतरही तिचा प्रवास थांबला नाही. अंध आणि दृष्टिहीन प्रौढांसाठी जर्मन भाषा शिकवण्याचा विशेष कार्यक्रम तिने सुरू केला. दृश्य माध्यमांवर अवलंबून असलेल्या नेहमीच्या अध्यापनाला पर्याय शोधत श्राव्य, स्पर्शाधारित आणि अनुभवकेंद्रित पद्धती वापरल्या.
याच विचारातून `Aesthesis Foundation for Visually Impaired` या संस्थेचीही सहस्थापना झाली. सौंदर्यशिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या वंचित अंध आणि दृष्टिहीन प्रौढांना अधिक स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न झाला. आणि मग उर्वीच्या आयुष्यात आणखी एक वळण आलं. अॅकॅडमिक क्षेत्रातून थेट कॉर्पोरेट जगतात-Capgeminiमध्ये जर्मन भाषा विश्लेषक म्हणून प्रवेश. इथेही ती फक्त भाषेपुरती थांबली नाही. `Speak, Listen, Connect`, `Travel to Germany` अशा प्रशिक्षण उपक्रमांतून भाषा, संवाद, संस्कृती आणि मानवी नात्यांवर काम करू लागली.
ICF मान्यताप्राप्त Associate Certified Coach म्हणून ती आता व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील संक्रमणांकडे नव्या नजरेने पाहायला मदत करते. तयार उत्तरं देण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला स्वतचे प्रश्न ऐकता यावेत, स्वतची दिशा शोधता यावी, यासाठी ती संवादाची जागा निर्माण करते.
कदाचित तिच्या संपूर्ण प्रवासाचा धागा इथेच सापडतो. संशोधक, लेखिका, भाषा अभ्यासक, प्रशिक्षक, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि कोच-भूमिका बदलत गेल्या, पण प्रश्न तोच राहिला… दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे अजून काय आहे? आणि कदाचित उर्वीच्या प्रवासाचं खरं सौंदर्य याच शोधात आहे.































































