शिंदे गटाने दगाबाजी केली, श्रीकांत शिंदेंचे काम करणार नाही, भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार; उल्हासनगरमध्ये अखेर युतीत ब्रेकअप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत दगाफटका करणाऱ्या शिंदे गटासोबत असलेली युती भाजपने आज तोडली. या निवडणुकीत भाजपचे ४ आणि शिंदे गटाच्या ३ नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली होती. मात्र शिंदे गटाने धोका देऊन भाजपच्या दोन नगरसेवकांची नावे कट करून स्वतःचे ५ नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे संतापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी युती तोडल्याची घोषणा करून आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, असा निर्धार केला.

उल्हासनगर महापालिकेत संख्याबळानुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक असून संख्याबळानुसार त्यांना ४ स्वीकृत नगरसेवक मिळायला हवे होते. मात्र महापौर अश्विनी निकम यांनी भाजपचे धनंजय बोडारे, बाळा श्रीखंडे या दोन स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करून दोन नावे वगळली. वगळलेल्या दोन नावांच्या जागी शिंदे गटाने हेमा पिंजानी, आशा पवार ही दोन नावे घुसडली. शिंदे गटाच्या महापौरांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. या पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, स्वीकृत नगरसेवक धनंजय बोडारे, भाजपचे ३७ नगरसेवक आदी उपस्थित होते.

प्रदेश अध्यक्षांकडे तक्रार केली

शिंदे गटाने केलेल्या या दगाबाजीची तक्रार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. यापुढे उल्हासनगरमध्ये भाजप हा शिंदे गटाबरोबर काम करणार नाही. यापुढे लोकसभेच्या निवडणुकीत उल्हासनगरमधील भाजपचे पदाधिकारी खासदार श्रीकांत शिंदे यांचे कोणतेच काम करणार नाहीत, असे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले.