जंतरमंतरवर दिल्ली पोलिसांकडून 3 महिला पत्रकारांशी गैरवर्तन आणि लैंगिक छळ; प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - ANI

मुख्य निवडणूक आयुक्ता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. राजधानी दिल्लीतही आम आदमी पार्टीसह इतर राजकीय पक्ष आणि संघटनांनी जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचे वार्तांकन करताना महिला पत्रकारांशी गैरवर्तन आणि लैंगिक छळ झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे सहायक पोलीस आयुक्त विवेक भगत हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून महिला पत्रकारांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रकरण तापल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल न करता हे प्रकरण पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत. ‘एएनआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा यांच्या अटकेचे चित्रीकरण करत असताना एसीपी विवेक भगत यांनी धक्काबुक्की व लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महिला पत्रकाराने केला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही पीडित महिला पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मी एसीपी भगत यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी मी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात गेले होते, असे पीडित महिला पत्रकार म्हणाले. तसेच इतर दोन महिला पत्रकारांनीही एसीपी भगत यांच्याविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

पोलिसांनी दिले चौकशीचे आदेश

3 ऑक्टोबर रोजी परिसरात बीएनएसएसचे कलम 163 लागू असतानाही आंदोलकांनी निदर्शने केली. इशारा देऊनही परिसर रिकामा न केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या तीन महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्याची तक्रार केली. या तक्रारींची नोंद घेऊन महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संपूर्ण प्रकरण चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे, असे डीसीपी नेहा यादव यांनी सांगितले. तसेच, या घटनेचा कोणताही व्हिडिओ किंवा पुरावा असल्यास तो गुन्हे शाखेकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

SIR मधून नाव वगळलेल्या 13 कोटी मतदारांना दिलासा; विरोधकांच्या आंदोलनाचा धसका घेत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

प्रेस क्लब ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रेस क्लब ऑफ इंडियाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जंतरमंतर येथे आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी दिल्ली पोलिसांनी केलेले वर्तन आणि त्यांच्यावर केलेली कारवाई अत्यंत धक्कादायक व निषेधार्ह असल्याचे प्रेस क्लबने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पत्रकार संघटना आणि राजकीय प्रतिनिधींनी या प्रकरणात तात्काळ एफआयआर नोंदवून दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.