
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ आता हिंदुस्थानी उद्योगांनाही बसू लागली आहे. युक्रेनमधील सुमी शहरात असलेल्या कुसुम ग्रुप या हिंदुस्थानी औषध निर्माण कंपनीच्या प्लांटवर रशियाने भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
सुमी येथील प्लांटला लक्ष्य करून केलेल्या या हल्ल्यामुळे इमारतीचे मुख्य स्ट्रक्चर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये ड्रोन धडकलेल्या जागेवरून धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत होते. या हल्ल्यातील जीवितहानी आणि जखमींचा निश्चित आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युद्ध सुरू झाल्यापासून हा प्लांट सतत कार्यरत होता, मात्र या हल्ल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार तब्बल 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
औषध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
कुसुम ग्रुप प्रामुख्याने 50 हून अधिक जेनेरिक औषध उत्पादने तयार करतो. युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि फिलिपिन्स यांसारख्या 9 पेक्षा जास्त देशांमध्ये या औषधांची विक्री केली जाते. सुमी येथील प्लांट उद्ध्वस्त झाल्यामुळे स्थानिक पातळीवर औषधांच्या पुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंदुस्थान ते युक्रेन…
कुसुम ग्रुपची सुरुवात 1994 मध्ये हिंदुस्थानातून युक्रेनमध्ये औषधांची निर्यात करणारी एक डिस्ट्रीब्यूटर कंपनी म्हणून झाली होती. सध्या या समूहाचे संचालन हिंदुस्थानी नागरिक राजीव गुप्ता करत आहेत. 2002 मध्ये कंपनीने इतर कंपन्यांची उत्पादने विकणे बंद करून स्वतःच्या ब्रँडची औषधे बाजारात आणण्यास सुरुवात केली. यानंतर औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत कंपनीने 2007 मध्ये हिंदुस्थानात आणि 2009 मध्ये युक्रेनमधील सुमी येथे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला. पुढे जाऊन कंपनीने हिंदुस्थानात आणखी दोन नवीन प्लांट सुरू केले.



























































