
शतकाचा एल्गार घेऊन आयची-नागोयात उतरलेल्या 495 खेळाडूंच्या हिंदुस्थानी पथकाचे शतक अवघ्या 15 पदकांनी हुकले, पण निराशेच्या सावटात सुरू झालेली हिंदुस्थानची आशियाई क्रीडा स्पर्धेची मोहीम अखेरच्या दोन दिवसांत अक्षरशः सुवर्णझंझावातात बदलली. स्पर्धेच्या उत्तरार्धापर्यंत पदकतालिकेत पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंनी अखेरच्या दोन दिवसांत तब्बल 11 सुवर्णपदकांची लयलूट करीत पदकतालिकेत जोरदार मुसंडी मारली. अखेर 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशा 85 पदकांसह हिंदुस्थानने चौथे स्थान पटकावले. पुरुष हॉकी संघाच्या दणदणीत सुवर्णविजयाने या झंझावाती मोहिमेवर शानदार शिक्कामोर्तब झाले.
16 दिवसांच्या क्रीडा महापुंभाचा रविवारी नागोयात दिमाखदार समारोप झाला. हिंदुस्थानी पथकाच्या महिला ध्वजवाहकाची जबाबदारी दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची मानकरी ठरलेल्या नेमबाज नीरू धांडा हिने समर्थपणे सांभाळली. हातात तिरंगा, गळय़ात पदके आणि चेहऱयावर विजयाचा आनंद घेऊन नीरूने समारोप सोहळय़ात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. नीरूची कामगिरीही या स्पर्धेतील हिंदुस्थानच्या दमदार पुनरागमनाचे प्रतीक ठरली. तिने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक अशी तीन पदके पटकावली. किनान चेनाईच्या साथीने मिश्र सांघिक ट्रप प्रकारात तिने सुवर्णपदकावर नाव कोरले. स्पर्धेनंतर मायदेशी परतलेली नीरू विशेषतः समारोप सोहळय़ासाठी पुन्हा नागोयात दाखल झाली.
मशाल आता दोहाच्या हाती
नागोयातील 16 दिवसांचा क्रीडा थरार संपताना पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेची मशाल आणि ध्वज कतारकडे सुपूर्द करण्यात आला. कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे आता आशियाई क्रीडाविश्वाचे लक्ष दोहाकडे वळले आहे. 2030 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद दोहाला मिळणार असून नागोयातील रंगतदार सोहळय़ाने पुढील पर्वाची नांदीही करून दिली.
पदकांचे शतक हुकले!
हिंदुस्थानच्या खात्यात 85 पदके जमा झाली असली तरी पदकांच्या शतकाची पुनरावृत्ती मात्र हुकली. हांगझोऊ येथे झालेल्या 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने विक्रमी 106 पदके, त्यात 28 सुवर्णपदके जिंकली होती. त्या तुलनेत यंदा एपूण पदकांची संख्या 21 ने, तर सुवर्णपदकांची संख्या सातने कमी झाली. त्यामुळे हांगझोऊच्या विक्रमी कामगिरीची पुनरावृत्ती झाली नाही. मात्र स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात हिंदुस्थानी खेळाडूंनी दाखवलेली झुंजार वृत्ती निश्चितच लक्षवेधी ठरली. हीच झेप हिंदुस्थानी खेळाडूंना प्रेरणादायक ठरली आहे.
अखेरच्या दोन दिवसांत ‘गेमच’ पलटला
स्पर्धेच्या उत्तरार्धापर्यंत हिंदुस्थानची पदकतालिका फारशी समाधानकारक दिसत नव्हती. गुरुवारपर्यंत खात्यात केवळ 10 सुवर्णपदके होती. पदकांचे शतक गाठायचे असेल तर अखेरचे काही दिवस हिंदुस्थानसाठी निर्णायक ठरणार हे स्पष्ट होते. मग सुरू झाला हिंदुस्थानी खेळाडूंचा ‘फिनिशिंग अटॅक.’ अखेरच्या दोन दिवसांत हॉकी, क्रिकेट, तिरंदाजी, बॉक्सिंग, पुस्ती अशा विविध क्रीडाप्रकारांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी एकामागोमाग एक सुवर्णपदके जिंकत पदकतालिकेचा नकाशाच बदलून टाकला. अवघ्या दोन दिवसांत 11 सुवर्णपदके आपल्या तिजोरीत टाकली. म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जितकी सुवर्णपदके जमा झाली होती, त्याहून अधिक सुवर्णांची कमाई अखेरच्या दोन दिवसांत झाली. या धडाक्यामुळे हिंदुस्थानने चौथे स्थान पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आणि अखेरची घंटा वाजली तेव्हा खात्यात होती 85 पदके. ही कामगिरी मोठी नसली तरी समाधानकारक निश्चित ठरली आहे.
डबल धमाका
हिंदुस्थानने कबड्डी, क्रिकेट आणि हॉकी या तिन्ही खेळांत शंभर टक्के यश मिळवले. या तिन्ही खेळांत प्रत्येकी दोन सुवर्णपदके होती आणि दोन्ही पदके हिंदुस्थानी पुरुष आणि महिला संघांनी जिंकली. या कामगिरीमुळे हिंदुस्थानने तालिकेत मुसंडी मारली. विशेष म्हणजे तिरंदाजीने पाच सुवर्णांसह नऊ पदके जिंकली.
आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानची विविध खेळांतील कामगिरी
खेळ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
तिरंदाजी 5 2 2 9
अॅथलेटिक्स 1 9 14 24
बॅडमिंटन 0 0 1 1
बॉक्सिंग 3 0 3 6
क्रिकेट 2 0 0 2
गोल्फ 1 1 0 2
हॉकी 2 0 0 2
कबड्डी 2 0 0 2
पुराश 0 0 1 1
मार्शल आर्ट्स 0 0 1 1
रोइंग 0 0 1 1
सेलिंग 0 1 2 3
सेपकटकरा 0 0 1 1
नेमबाज 3 8 4 15
टेनिस 0 0 1 1
स्क्वॉश 0 2 3 5
टेबल टेनिस 0 0 1 1
वेटलिफ्टिंग 0 1 0 1




























































