
World Championship of Legends 2026 च्या तिसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. मिस्टर 360 म्हणून प्रचलित असणाऱ्या एबीने निवृत्तीनंतरही आपल्या फलंदाजीची धार कमी झाली नसल्याच दाखवून दिलं आहे. कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या एबीने आपली जबाबदारी चोख पार पाडल दुसऱ्या विकेटसाठी रिचर्ड लेवीसोबत 104 धावांची शतकी भागादीर रचली.
दक्षिण आफ्रिका या स्पर्धेतील आपला पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला 20 षटकांमध्ये 243 धावांचे तगडे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करताना फाफ डुप्लेसिस (14 धावा) स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार एबी आणि रिचर्ड लेवीने संघाची सर्व सुत्र आपल्या हाती घेत गोलंदाजांची धुलाई सुरू केली. रिचर्ड लेवीने तुफानी फलंदाजी करताना 39 चेंडूत तब्बल 87 धावांची विस्फोटक खेळी केली, ज्यामध्ये 8 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, कर्णधार एबी डिव्हिलियर्सनेही मागे न राहता 39 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 243 धावांचे डोंगरा एवढे लक्ष्य उभे केले.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 243 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज चॅम्पियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि 52 धावांवरच त्यांचे 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. एका बाजूला विकेट्स सतत पडत असताना, दुसऱ्या बाजूने कर्णधार क्रिस गेलने मात्र आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. गेलने 31 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 60 धावांची अर्धशतकीय खेळी केली. शेवटी एरोन फंगीसोने क्रिस गेलला बाद करून वेस्ट इंडीजला मोठा धक्का दिला. सध्या सामना सुरू असून 16.1 षटकांचा खेळ झाला तेव्हा वेस्ट इंडिजची अवस्था 8 बाद 132 अशी होती. तसेच जिंकण्यासाठी त्यांना 23 चेंडूंमध्ये 111 धावांची आवश्यकता आहे.





























































