‘दृश्यम’ चित्रपट पाहिला अन् होत्याचं नव्हतं झालं! लेकाने जन्मदात्याचा संपवलं; बायकोच्या आठवणीने डाव फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका 26 वर्षीय मुलाने आपल्याच वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीचा वाद आणि कौटुंबिक कलहातून हा भयंकर प्रकार घडल्याच पोलीस तपासात उघडं झालं आहे. मात्र, वडिलांना संपवण्यासाठी शिवशंकरने रचलेला कट एकून सर्वच हादरले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये वास्तव्याला असणाऱ्या शिवशंकरने दृश्यम 3 चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून प्रभावित झालेल्या शिवशंकरने थेट बिहार गाठलं आणि गावी जाऊन वडिलांच्या खूनाचा कट रचला. विशेष म्हणजे मोबाईल बंद ठेऊन त्याने सुरत ते बिहार असा प्रवास केला. 26 जुलैच्या रात्री तो समस्तीपूरमधील दरवास या त्याच्या गावी पोहोचला आणि घराबाहेर झोपलेल्या 50 वर्षीय वडिलांवर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. India Today ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करत तो पुन्हा सुरतला पसार झाला होता, मात्र एका चुकीमुळे त्याचा संपूर्ण कट उघड झाला. प्रवासादरम्यान बंद असलेला मोबाईल त्याने पाटोरी रेल्वे स्थानकावर पोहोचताच थोड्या वेळासाठी सुरू करून आपल्या पत्नीला फोन केला आणि पुन्हा बंद केला. हाच छोटासा तांत्रिक पुरावा पोलिसांच्या हाती लागला. याशिवाय वडिलांच्या अंत्यसंस्काराला अनुपस्थित राहिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याच्या पत्नीशी झालेल्या संभाषणाचा सुगावा लावला आणि सुरत गाठून अवघ्या काही तासांतच आरोपी शिवशंकरला बेड्या ठोकल्या. चौकशी दरम्यान त्याने ‘दृश्यम’ चित्रपटापासून प्रेरणा घेऊन हा खून केल्याची कबुली दिली आहे.