मलेशियन इंजिनीअर आत्महत्या प्रकरण, ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश; केरळ सरकारचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतचोरी, एसआयआर प्रक्रियेमधील गडबडीमुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांचा राजीनामा घेऊन देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून त्यांना हटविण्याची मागणी जोर धरत आहेत. त्यातच केरळच्या गृहमंत्र्यांनी एक मोठे पाऊल उचलत 2006 मधील मलेशियन इंजिनीअर आत्महत्या प्रकरणात ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

केरळ सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ज्ञानेश कुमार सचिव म्हणून कार्यरत होते. त्यावेळी 2006 मध्ये जागतिक बँकेच्या निधीतून केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (केएसटीपी) अंतर्गत अंगामाली ते तिरुवनंतपुरमदरम्यान एमसी रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पातील कामादरम्यान मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकल्पाशी संबंधित मलेशियन सिव्हिल इंजिनीअर ली. सी. बीन यांनी आत्महत्या केली होती. यावेळी सापडलेल्या एका चिठ्ठीत ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख होता. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी 2006 मधील या प्रकरणाशी संबंधित सर्व फाईल्स पुन्हा एकदा उघडत नव्याने चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण…

केरळ राज्य परिवहन प्रकल्पाशी संबंधित मलेशियाच्या पती-बेल पंपनीचे इंजिनीअर ली.सी. बीन यांनी 2006 मध्ये आत्महत्या केली होती. प्रकल्पाचे रखडलेले बिल आणि सरकारी अधिकाऱयांकडून येणाऱया अडचणींमुळे ते त्रस्त असल्याचे सुसाईड नोटमधून समोर आले होते. केरळमधील काही सरकारी अधिकाऱयांवर त्यात गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी संपण्यापूर्वीच ज्ञानेश कुमार यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव पदावरून हटवून त्यांची बदली करण्यात आली होती. त्यावेळी प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. मात्र कोणत्याही तार्किक निष्कर्षापर्यंत न पोहोचताच हे प्रकरण दबावाखाली बंद करण्यात आल्याची तक्रार केपीसीसी नेते मलयिनकीझु वेणुगोपाल यांनी केली आहे.