अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात देशभरात डीआरआयची मोहीम; 5 जणांना केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 29 आणि 30 सप्टेंबर रोजी देशभरात गुप्त माहितीच्या आधारे तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये अॅम्फेटामाइन, कोकेन आणि हेरॉईन या अंमली पदार्थांचे मिळून एकूण 15 किलो 590 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

डीआरआयने 30 सप्टेंबरला दीड तास पाठलाग करून मध्य प्रदेशातील इंदूरमधील बिचोली मर्दाना परिसरात थार गाडी अडवली आणि त्यातून 7 किलो 116 ग्रॅम अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिन्ही जणांना अटक करण्यात आली. 29 सप्टेंबरला  करण्यात आलेल्या एका कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा येथून येणा-या एका भारतीय प्रवाशाला अडवले. त्याच्या केबिन सामानाची तपासणी केली असता, त्यामध्ये चॉकलेटच्या 7 नळ्या आढळून आल्या. या नळ्यांमध्ये फिकट पिवळ्या रंगाच्या 207 कॅप्सूल आढळल्या. नाकाxटिक ड्रग डिटेक्शन किटच्या साहाय्याने तपासणी केली असता हा पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. एकूण 4.9 किलो कोकेन जप्त करण्यात करून या प्रवाशाला अटक करण्यात आली. याच दिवशी डीआरआयच्या अधिकाऱयांनी पंजाबमधील जालंधरच्या फिल्लौरजवळ पाळत ठेवून टॅक्सीतील प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या बॅकपॅकमध्ये 3 पाकिटे हेरॉईन आढळले.