
किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून उडी मारून ठाण्यातील सुयोग पांचाळ या ३७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. टकमक टोकाखाली निजामपूरच्या दिशेने ८०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळला. प्रचंड झाडी, खोल दरी आणि तीव्र उतारामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाड तालुका पोलिसांकडून सुरू आहे.
सुयोग पांचाळ शनिवारी किल्ले रायगडावर आला होता. त्याने आत्महत्या करणार असल्याचे फोन करून आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ सुवेल याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उभी केलेली मोटारसायकल पाहिली. त्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीने तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्रीच्या वेळी अंधार आणि टकमक टोकाखालील अत्यंत धोकादायक दरीमुळे शोधकार्य थांबविण्यात आले. सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी ड्रोनच्या मदतीने परिसराची पाहणी केली असता टकमक टोकाच्या खाली निजामपूरच्या बाजूला सुमारे ८०० फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.






























































