
मानपाड्यात निवडून आलेल्या स्थानिक नगरसेविकेचा जातीचा दाखला संशयास्पद असल्याचे सांगत प्रदीप पुर्णेकर पाठपुरावा करत होते, त्यासाठी त्यांचा लढा सुरू होता. त्यामुळेच त्यांचा काटा काढला काय, असा सवाल शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला. लोकशाहीचा खून म्हणतात तो हाच आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
मनोरमानगर येथील गणेशनगरात आज दिवंगत प्रदीप पुर्णेकर यांना अद्धांजली वाहण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी ठाण्यात सुरू असलेल्या राजकीय दहशतीवर घणाघात करतानाच पोलीस प्रशासन आणि सरकारबर ताशेरे ओढले, ते म्हणाले, प्रदीप पुर्णेकर हे मनीरमानगरातील १७० एकर जमिनीवर होणाऱ्या मनमानी बलस्टरविरोधात लढत होते. स्थानिक नागरिकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ते संघर्ष करत होते. तरुण पिढीला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रग्जविरोधी मोहीम सुरू केली होती. इतकेच नव्हे तर येथे निवडून आलेल्या नगरसेविकेच्या संशयास्पद जातप्रमाणपत्रावरही त्यांनी आवाज उठवला होता. तो दाखला महाराष्ट्राबाहेरचा होता, त्याला कायद्याने, अभ्यासाने आणि पुराव्याने उत्तर देण्याऐवजी त्यांचा काटाच काढण्यात आला असेल तर सरकारला लागलेला हा कलंक आहे. असे जाधव म्हणाले.
गुन्हेगार पाताळात लपला तरी शोधून काढीन, कोणालाही सोडणार नाही, अशा वल्गना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. पण त्यांनी एकाला तरी शोधून काढले काय, अशी टीका जाधव यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे गेली दहा वर्षे गृहखाते आहे, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नाही, पोलिसांचा दरारा संपला आहे, असेही त्यांनी सुनावले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे, पुर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती, पुत्र राम आणि बंधू जयनाथ यांच्यासह विभागातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























































