
शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येने आगरी-कोळी भूमिपुत्रांमध्ये भयंकर संताप आहे. पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासातही दिरंगाई सुरू आहे. या हत्येचे सूत्रधार आणि मारेकऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा. पूर्णेकरांना १५ दिवसांत न्याय मिळाला नाही तर आगरी-कोळी समाज ताकदीनिशी लढेल, असा इशारा आज भूमिपुत्रांच्या संघटनांनी दिला.
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या या मागणीसाठी कल्याण, भिवंडी, ठाण्यातील आगरी-कोळी भूमिपुत्र आज ठाण्यात एकवटले. या मोर्चात आगरी कोळी समाजाच्या प्रतिनिधींसह आगरी सेना महाराष्ट्र, २७ गाव संघर्ष समिती, नवी मुंबई विमानतळ संघर्ष समिती, शेतकरी संघटना अंजुर-दिवे, आगरी-कोळी तात्कर्ष मंडळ कल्याण या संघटना सहभागी झाल्या होत्या.
आगरी-कोळी समाजाच्या प्रतिनिधी, कार्यकत्यांनी पूर्णेकर यांच्या गणेशनगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भैर घेतली आणि त्यांचे सांत्वन केले, पूर्णेकर यांच्या कुटुंबाला साथ देण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आगरी कोळी समाज त्यांच्या घरी आला आहे. यापुढे त्यांना न्याय मिळाला नाही तर भूमिपुत्र पेटून उठतील आणि न्याय मिळेपर्यंत लढत राहतील, असा इशारा शिवसेनेच्या माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी दिला. ठाण्यात हम करे सो कायदा सुरू आहे. आज पूर्णेकर गेले, उद्या असेच आणखी कोणाचे तरी बळी जातील हे उघड्या डोळ्यांनी पाहायचे काय, असा सवाल त्यांनी केला.
यावेळी आगरी सेना अध्यक्ष प्रदीप साळवी, माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी नगरसेवक संजय तरे, आगरी सेना कल्याण जिल्हाप्रमुख नगरसेवक विजय जोशी, स्वाभिमानी भूमिपुत्र संघटना सर्वेश तरे, २९ गाव संघर्ष समिती नवी मुंबई दीपक पाटील, आगरी सेना अंबरनाथ मंगेश शेलार, अखिल आगरी समाज संघटना शनी आंबरे, २७ गाव संघर्ष समिती कल्याण महासंघ महेंद्र पाटील, युवामोचा संघटना कल्याण पाटील, आगरी समाज संघटना कर्जत संतोष पेरणे, आगरी एकता संघटना मीरा-भाईंदर प्रशांत म्हात्रे, आगरी सेना उपाध्यक्ष चंद्रकांत ठाणकर, शिवसेनेचे भिवंडी जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, माहरा भगत (मुरबाड), अरविंद म्हात्रे (शेतकरी संघटना, भिवंडी), भाऊ पाटील (कल्याण), राजाराम पाटील (अलिबाग), किशोर पाटील (बदलापूर), कृष्णा धुमाळ (अंबरनाथ), नारायण अंदाडे (शहापूर), जयेंद्र खुणे (आगरी सेना, मुंबई) हे उपस्थित होते.
आज पोलीस आयुक्तांना भेटणार
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या भूमिपुत्र संघटनांना उद्या सोमवारी भेटण्याची वेळ दिली आहे. त्यामुळे पूर्णेकरांच्या खुन्यांना तातडीने जेरबंद करा. जे सूत्रधार आहेत त्यांना अटक करा या मागणीसाठी त्यांना सोमवारी भेटून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आगरी-कोळी उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली
तिन्ही मारेकऱ्यांची फेस टू फेस
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील तिन्ही मारेकऱ्यांची ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने फेस टू फेस चौकशी केली. या गुन्ह्याच्या तपासात काही साम्य जुळते का, काही धागेदोरे सापडतात का, इतर आरोपींबाबत ठोस माहिती मिळते का, यासाठी ही चौकशी करण्यात आली. एका १८ वर्षीय संशयित तरुणीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
पप्या शिंदे, निखील यादव आणि नितेश पवार या तिम्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधन आणि खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शैलेश साळवी यांनी तिघांची सहा तास चौकशी केली. पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर तसेच पूर्णेकर यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्तींनाही पोलिसांनी तपासासाठी बोलावले होते





























































