मध्य प्रदेशातील सालाच्या जंगलावर ‘हार्टवूड बोरर’ किड्याचा हल्ला; केंद्र सरकारकडून तब्बल 1.4 लाख झाडांवर कुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील दिंडोरी आणि मंडला परिसरातील समृद्ध सालाच्या जंगलावर ‘हार्टवूड बोरर’ नावाच्या किडीने हल्ला केला आहे. या किडय़ामुळे जंगल नष्ट होण्याची भीती निर्माण झाल्याने केंद्र सरकारने संसर्ग झालेली तब्बल 1.47 लाख झाडांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. हे लाकूड नंतर सरकारी लिलावात विक्रीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

‘हार्टवूड बोरर’ या उपद्रवी किडीच्या हल्ल्यामुळे कोटय़वधी रुपयांची झाडे वाळू लागली आहेत. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्य प्रदेश वन विभागाने स्थानिक आदिवासी आणि गावकऱयांना सोबत घेऊन मोठी मोहीम सुरू केली आहे. गावकऱयांना रोजगार मिळावा आणि जंगलाला संजीवनी मिळावी यासाठी वन विभागाकडून एका किड्य़ामागे दोन रुपये देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे  लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे कीटक पकडण्यासाठी गर्दी करत आहेत. या कीटकाच्या संकलनासाठी वन विभागाने दिंडोरी जिल्ह्यात आठ केंद्रे सुरू केली आहेत. गावकऱयांनी आतापर्यंत 19,25,118 कीटक गोळा केले असून त्यांच्या खात्यात 38.5 लाख रुपये जमा झाले आहेत.

दोन टप्प्यांत काम सुरू

जंगल वाचवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर दोन टप्प्यांत काम सुरू आहे. त्यात कीटक पकडणे आणि दुसरे बाधित झाडे तोडणे. सालाचे जंगल हे मध्य भारताच्या पर्यावरण व्यवस्थेचा कणा आहे. कान्हा आणि पेंचसारख्या व्याघ्र प्रकल्पांचे अस्तित्व या सालाच्या जंगलांवरच टिकून आहे. त्यामुळे उर्वरित जंगल वाचवण्यासाठी बाधित झाडे तोडण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे मध्य प्रदेश वन विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.