हे तर गेंड्याच्या कातडीचे सरकार! नाशिकमधून निघालेला आदिवासी जेन झींचा उलगुलान मोर्चा भिवंडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हक्कासाठी लढा देणाऱ्या शेकडो जेन झी आदिवासी विद्यार्थ्यांचा नाशिकहून निघालेला उलगुलान मोर्चा आज भिवंडीत दाखल झाला. ४८ दिवस आम्ही आंदोलन करूनही सरकारला जाग येत नसेल तर हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. मुंबईत धडक देऊन कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करणारच, असा निर्धार या मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

आदिवासी आश्रम शाळांमध्ये मागील दोन वर्षांत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यास सर्वस्वी आदिवासी विकास मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. गडचिरोली येथे सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी तसेच आश्रम शाळांमध्ये जेवण बनवण्याची परवानगी देऊन सेंट्रल किचन बंद करावे, अशी मागणी करत या विद्यार्थ्यांनी तब्बल ४८ दिवस नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र सरकार आणि प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने या विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. हा मोर्चा आज भिवंडी तालुक्यातील येवई नाका येथे दाखल झाला.

आदिवासी विकासमंत्र्यांचा राजीनामा घ्या !

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा. आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव इतर प्रशासनातील अधिकारी यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात, अशी मागणी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अरुण पावरा यांनी केली आहे.

सरकारच्या छाताडावर बसू

४८ दिवस आंदोलन करूनही गेंड्याच्या कातडीचे सरकार मागण्यांकडे लक्ष देत नाही. समाजातील जेन झी हा वर्ग आता रस्त्यावर उतरला असून सरकारच्या छाताडावर बसून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार धनश्री पराडके या तरुणीने व्यक्त केला आहे.