ठाणे शहराभोवती ड्रग्जचा विळखा घट्ट, नौपाड्यात एमडीचा मोठा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांस्कृतिक आणि तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराभोवती ड्रग्जचा विळखा घट्ट होऊ लागला असल्याचे लागोपाठ दोन कारवायांमधून उघड झाले आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कळव्यापाठोपाठ नौपाडा पांढरपेशी वस्तीत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. समीर पठाण या तस्काराकडून दीड किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ४२ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.

पोलीस हवालदार अमोल देसाई यांना माहिती मिळाली की, कल्याण, पत्रिपूल येथील समीर पठाण हा नौपाड्यातील गुरुकुल सोसायटीजवळील नाशिक-मुंबई वाहिनीवरील पादचारी पुलाजवळ एमडी विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, प्रशांत निकुंभ, अनुप राधे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा लावून मध्यरात्रीच्या सुमारास समीरला ताब्यात घेतले. त्याच्याकडील अमली पदार्थाचे वजन १ किलो ४२० ग्रॅमइतके आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा एमडीचा साठा कुठून आणला आणि तो कोणाला विकला जाणार होता याचा ते तपास करत आहेत. दरम्यान ठाणे शहराभोवती ड्रग्जचा विळखा घट्ट होऊ लागल्याने पालकवर्गात घबराट पसरली आहे.

तस्करांना मोकळे रान

ठाणे शहरात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर अनेक नेत्यांनी ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तस्करांना मोकळे रान मिळाल्यामुळे ठाणे शहर हे ड्रग्जचा अड्डा बनले आहे. या ड्रग्ज तस्करांना सत्ताधाऱ्यांकडून अभय मिळत असल्याचा आरोपही काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे ठाणे पोलीस वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नौपाड्यासारख्या पांढरपेशी वस्तीत ड्रग्जचा साठा जप्त झाल्यामुळे या भागातील नागरिकांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.