
अमेरिकेच्या हवाई दलाने इंग्लंडमधील लष्करी हवाई तळावरून बॉम्बर विमाने माघारी बोलावली आहेत. आरएएफ फेअरफोर्ड तळावर झालेल्या संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या तपासानंतर अमेरिकन लष्कराने हा निर्णय घेतला. इराणवर हल्ले करण्यासाठी ही बॉम्बर विमाने इंग्लंडमधील आपल्या लष्करी हवाई तळावर तैनात करण्यात आली होती. ही बॉम्बर विमाने मायदेशी परत पाठवण्यात आली आहेत, असे पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
लंडनपासून 160 किलोमीटर पश्चिमेस असलेल्या आरएएफ फेअरफोर्ड या तळाचा वापर अमेरिकन बॉम्बर विमानांनी मध्य पूर्वेतील अनेक दशकांच्या संघर्षादरम्यान केला आहे. सप्टेंबरच्या अखेरीस आरएएफ फेअरफोर्ड येथे घडलेल्या एका सुरक्षाविषयक घटनेनंतर, दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून गेल्या आठवड्यात मध्य लंडनमध्ये ब्रिटन आणि इराणचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या तपासादरम्यान एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली, असे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
‘मिलिटरी एअर ट्रॅकिंग अलायन्स’सारख्या विमान वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थांनी इराणविरुद्धच्या संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ‘आरएएफ फेअरफोर्ड’वरून डझनभर बी-52 (B-52) आणि बी-1 (B-1) बॉम्बर विमाने कार्यरत असल्याचे पाहिले आहे. रविवारी या तळावरून अनेक बी-1 बॉम्बर विमाने उड्डाण करताना निरीक्षकांच्या निदर्शनास आले.

































































