
बिहारमधील सारण जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तिथे पूरग्रस्त लोकांना मदत वाटत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने थेट पिस्तूल रोखल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.
सारण जिल्ह्यातील मकेर पोलीस स्टेशनचे प्रभारी (एसएचओ) संग्राम कुमार सिंह असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पूरग्रस्तांना मदत साहित्यांचे वाटप सुरू असताना त्यांनी लोकांच्या दिशेने पिस्तूल रोखल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने याला बेशिस्त आणि मनमानी कारभार असल्याचे म्हटले आहे. सारण एसएसपी कार्यालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, संग्राम कुमार सिंह यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून निलंबन काळात त्यांना नियमांनुसार निर्वाह भत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

































































