
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरसोयींविरोधात फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांच्या संतापाचा स्फोट झाला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत शैक्षणिक दुरवस्थेविरोधात आंदोलन करत आहेत. आंदोलनादरम्यान 24 शाळांची तोडफोड आणि जोळपोळ करण्यात आली. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून खबरदरीचा उपाय म्हणून देशातील 400 ते 500 माध्यमिक शाळा पूर्णतः किंवा अंशतः बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
शिक्षणाच्या दर्जाबाबत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये सुरू झालेली ही निदर्शने आता मॉन्टपेलियर, नँट्स आणि मार्सेली यांसारख्या इतर शहरांमध्येही पोहचली आहेत. शिक्षकांची कमतरता, वर्गांमधील अतिगर्दी आणि जीर्ण इमारती यांबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
फ्रान्समधील 3700 शाळांपैकी 735 शाळांना हिंसक निदर्शनांचा फटका बसला आहे, असे फ्रान्सचे न्यायमंत्री जेराल्ड डार्मॅनिन यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेत आतापर्यंत 78 शैक्षणिक कर्मचारी जखमी झाले आहेत. डाव्या विचारसरणीच्या कट्टरपंथीयांनी विद्यार्थी चळवळीत घुसखोरी करून हिंसाचार भडकावव्याचा दावा शिक्षण मंत्र्यांनी केला आहे. हे आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी 85 टक्के अल्पवयीन आहेत.
विद्यार्थी आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार पुढील पावले उचलत आहे, असे फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने ठोस उपाययोजना जाहीर केल्या नसल्याचा आरोप करत आंदोलक संघटनांनी मंगळवारीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.



























































