विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या, पोलिसी बळ दाखवू नका! विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कासाठी, आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी प्रवासादरम्यान रात्री ३ वाजता आदिवासी विद्यार्थ्यांना वाटेतच रोखल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुमारे 300 किलोमीटरचा लांब प्रवास करून मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी परवानगी नाकारत जबरदस्तीने ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिवर व्हायरल होत असून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका होत असून त्यांच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध केला आहे.

विजय वड्डेटीवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी आंदोलन सुरू होण्याआधीच ते चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या फोटोंचे क्लिप्स काढणे, त्यांच्यावर केसेस करण्याची धमकी देणे आणि बस ताब्यात घेणे हे कुठल्या लोकशाहीत बसते? सरकार नेमके कशाला घाबरत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसी बळ वापरणे म्हणजे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा सरकराच प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा थेट इशारा यावेळी विजय वड्डेटीवार यांनी सरकारला दिला. या घटनेदरम्यान महाराष्ट्र एनएसयुआयचे अध्यक्ष सागर कैलास साळुंके यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना उचलून गाडीत कोंबणे हा योग्य मार्ग नाही. पोलिसी बळाने आंदोलनाचा आवाज काही काळ दाबता येईल, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कधीच दाबता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना भेटावे, त्यांचे म्हणणे ऐकावे आणि ही दडपशाही तातडीने थांबवावी, अशी मागणी विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.