
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्त्याने पाच गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. KJP21 या 32 महिन्यांच्या मादी चित्त्याने सोमवारी पाच निरोगी बछड्यांना जन्म दिला. यामुळे हिंदुस्थानातील चित्त्यांची एकूण संख्या 60 वर पोहोचली असून, त्यापैकी 41 चित्ते हिंदुस्थानात जन्माला आले आहेत. KJP21 ही हिंदुस्थानात जन्मल्यानंतर पिल्लांना जन्म देणारी तिसरी मादी चित्ता ठरली आहे. यापूर्वी मुकी आणि KGP12 या मादी चित्त्यांनी हिंदुस्थानात पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
या पाच बछड्यांच्या जन्माचे आणखी एक विशेष महत्त्व आहे. त्यांचे वडील बोत्सवानामधून हिंदुस्थानात आणलेले नर चित्ता आहेत. त्यामुळे या पिल्लांपासून हिंदुस्थानात बोत्सवाना वंशाची नवी आनुवंशिक रेषा सुरू झाली आहे. चित्त्यांच्या वाढत्या संख्येसोबत हिंदुस्थानातील त्यांच्या आनुवंशिक विविधतेलाही यामुळे बळ मिळणार आहे.

























































