भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियामध्ये पुनरागमन, कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. IPL मध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे त्याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन होईल, अशा चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. नोव्हेंबर 2022 नंतर तो देशासाठी एकही सामना खेळलेला नाही. मात्र, आता त्याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघात नाही तर, हाँगकाँग सिक्स सिरिजसाठी ‘क्रिकेट हॉंगकॉंग, चायना’ने  घोषणा करत भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

हाँगकाँग सिक्स सिरिजचा धमाका 30 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जवळपास एक महिना रंगणाऱ्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या संघासह एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. याच स्पर्धेसाठी आज (05 ऑक्टोबर 2026) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भुवनेश्वर कुमारसह IPL मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. कृणाल पंड्या, शशांक सिंह, नितीश राणा, टी नटराजन, राहुल तेवतिया आणि राहुल त्रिपाठी यांचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.

स्पर्धेसाठी टीम इंडियाचा समावेश ग्रुप-सी मध्ये करण्यात आला असून या ग्रुपमध्ये टीम इंडियाव्यतिरिक्त, UAE आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. तर ग्रुप-ए मध्ये हाँगकाँग चीन, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. ग्रुब-बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि स्कॉटलंड. ग्रुप-डी मध्ये दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि ओमान यांचा समावेश आहे. स्पर्धेला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.