
देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इंधन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान इंधन अर्थात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF)च्या वाढत्या किमतीमुळे कंपनीचा परिचालन खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. हे नवे शुल्क 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून होणाऱ्या सर्व नवीन बुकिंगसाठी लागू होणार आहे.
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, देशांतर्गत विमान प्रवासासाठी अंतरानुसार 375 रुपयांपासून 1,300 रुपयांपर्यंत इंधन शुल्क आकारले जाणार आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे शुल्क 1,000 ते 10,000 रुपयांपर्यंत असेल.
अंतरानुसार देशांतर्गत इंधन शुल्क आकारण्यात येणार आहे. 500 किमीपर्यंत 375 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर 2 हजार किमीपेक्षा अधिक प्रवासाचे अंतर असल्यास, 1 हजार 300 रुपये आकारण्यात येतील. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत ATFच्या किमतीत मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे. विशेषतः मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या एका महिन्यात ATFच्या किमतीत 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, त्यामुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चावर मोठा परिणाम होत आहे.
विमान कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये ATFचा मोठा वाटा असतो. त्यामुळे इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम विमान कंपन्यांच्या तिकीट दरांवर आणि त्यांच्या एकूण आर्थिक गणितावर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिगोने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी इंधन शुल्कात बदल केला आहे. यापूर्वीही इंडिगोने सप्टेंबरमध्ये काही पूरक सेवांचे शुल्क वाढवले होते. लहान मुलांसोबत प्रवास करण्याचे शुल्क देशांतर्गत मार्गांवर 2 हजार 200 रुपयांवरून थेट 3 हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच एकट्याने प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी देशांतर्गत प्रवासाचे शुल्क 5 हजार 999 रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 12 हजार 999 रुपये आहे. ‘फास्ट फॉरवर्ड’ सेवेसाठी 650 रुपये आणि प्रवास प्रमाणपत्रासाठी 300 रुपये शुल्क आकारले जाते.



























































