
गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटीमध्ये रामायण चित्रपटाच्या सेटला सोमवारी दुपारी 4.2 वाजता भीषण आग लागली. या आगीत विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स, केबल्स, दरवाजे, लाकडी फळ्या, एसी युनिट्स, बांबू आणि प्लास्टिकचे साहित्य, साऊंड सिस्टीम आणि शूटिंगची उपकरणे जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. अथक प्रयत्न करत 53 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटाच्या चित्रीकरणाशी हा सेट संबंधित आहे. प्राइम फोकस स्टुडिओच्या मागे, रिलायन्स मीडिया वर्क्सजवळ ही आग लागली. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच नुकसानीची सविस्तर माहिती देखील अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीएमसी अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी वॉर्ड नियंत्रण कक्ष आणि 108 रुग्णवाहिकेची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.


























































