सर्वोच्च न्यायालयात तीन नवीन न्यायमूर्ती, कॉलेजियमच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे संख्याबळ वाढणार आहे. सध्या विविध उच्च न्यायालयांत कार्यरत असलेल्या तीन न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली आहे. या न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केली होती. त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांचा समावेश आहे. हे तिन्ही न्यायमूर्ती मंगळवारी, 6 ऑक्टोबरला शपथ ग्रहण करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळालेल्या न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल या सध्या गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहत आहेत. तसेच न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती उपाध्याय यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायदान केले आहे. तसेच न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांना तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 28 सप्टेंबर रोजी शिफारस केली होती. तीन नव्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे संख्याबळ 37 वर पोहोचणार आहे.