सोनाली व घुफ्रान ठरले सारस्वत चषकाचे मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई झालेल्या पहिल्या सारस्वत ब्राम्हण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने प्रशांत मोरेला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करत सारस्वत चषक पटकावला. घुफ्रानने प्रशांतवर या अंतिम सामन्यात 24-11, 10-25 व 24-17 असा विजय साकारला.  सारस्वत ब्राम्हण समाज, मुंबई यांच्या वतीने आणि  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या निलांश चिपळूणकरने बाजी मारली. त्याने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर तीन सेटनंतर 25-23, 9-12 व 21-21 असा निसटता विजय मिळवला.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारीने आपल्या नेत्रदीपक खेळाने सर्वांची मने जिंकली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत सोनालीने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला 9-25, 25-17 व 19-17 असे चीत करत या गटाचे विजेतेपद पटकावत सारस्वत चषक काबीज केला. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या अंजली सिरीपुरमने मुंबईच्या मिताली पाठकवर तीन सेटमध्ये 21-24, 24-14 व 25-10 अशी मात केली.

विजेत्यांना सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष किशोर रांगणेकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके, सारस्वत चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, सारस्वत ब्राम्हण समाजाचे मुख्य सचिव राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष सुभाष कामत व कार्यकारिणी सदस्य रवींद्रनाथ भांगले आदी मान्यवर उपस्थित होते.